(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
परराज्यातील (गोवा राज्य निर्मित) मद्याचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठा करून महाराष्ट्रात वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (शुक्रवारी, दि. २७ फेब्रुवारी २०२६) पहाटे धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा राज्यातच विक्रीस परवानगी असलेल्या ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’च्या १३०० बॉक्ससह एक सहाचाकी कंटेनर ताब्यात घेण्यात आला.
ही कारवाई मौजे हातीवले, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील प्रस्तावित टोलनाका परिसरात, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर करण्यात आली. संबंधित वाहनातून गोवा निर्मित मद्याची अवैधरित्या साठवणूक करून महाराष्ट्रात वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या मद्यामध्ये ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडचे एकूण १३०० कागदी बॉक्स (११,२३२ बल्क लिटर) असून, या मद्याची किंमत सुमारे १ कोटी ३७ लाख २८ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा सहाचाकी कंटेनर (नोंदणी क्र. एमएल ०१ एडी ०१२१) असा एकूण १ कोटी ५९ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हा रजि. क्र. ०६२/२०२६ अन्वये जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाहनचालक आरोपी गणेश कुमार पोकरराम (रा. नागणेशियान डूढा, बारमेर, राजस्थान – ३४४०३५) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई) व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी अधीक्षक श्रीमती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक गणेश जाधव तसेच जवान वैभव सोनावले, मलिक धोत्रे (वाहनचालक), मानस पवार, विशाल भोसले, निलेश तुपे व सागर टिकार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई अंमलात आणली. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही हातभट्टी दारू निर्मिती, बेकायदेशीर मद्य साठवणूक, परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक किंवा बनावट मद्य विक्री सुरू असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअँप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल-फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांनी केले आहे. खबर देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

