(सिंधुदूर्ग / सावंतवाडी)
सावंतवाडीतील मोती तलाव येथे शनिवारी दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थीनीसह २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने सावंतवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून विद्यार्थीनी आणि संबंधित तरुणामध्ये घटनेपूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काही वेळातच विद्यार्थीनीने तलावात उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, या वादामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत विद्यार्थीनी लिशा गोसावी आणि रोहन विजय गोसावी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून मैत्री होती. लिशा यंदा दहावीच्या वर्गात शिकत असल्याने तिच्या पालकांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. दरम्यान, रोहनकडून फोन आणि मेसेजद्वारे वारंवार संपर्क साधला जात असल्याने लिशाने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. याच पार्श्वभूमीवर रोहन मुंबईतील नालासोपारा येथून सावंतवाडीत आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी मोती तलाव परिसरातील बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यामागे लिशा, रोहन आणि तिची चुलत बहीण खुशी गोसावी हे तिघे एकत्र आले होते. या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लिशा आणि रोहन यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाल्याचे आणि परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात आल्यानंतर खुशीने कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न केल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, लिशा आणि रोहन यांनी तिला फोन करण्यापासून रोखल्याचे समोर आले आहे. त्यानंतर तिघेही तेथून निघून गेले.
यानंतर काही वेळाने लिशाने रोहनला पुन्हा संपर्क न करण्याची ताकीद दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यानंतर तिने अचानक मोती तलावात उडी घेतली. लिशाला पाण्यात बुडताना पाहून तिची चुलत बहीण खुशीने आरडाओरडा केला. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी रोहननेही तलावात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी खुशी गणपत गोसावी हिच्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी दोन्ही मृत्यूंची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिसांकडून सध्या या संपूर्ण घटनेचा विविध अंगांनी तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी दोघांचे मोबाईल फोन महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांनी लिशा आणि रोहन यांचे मोबाईल ताब्यात घेतले आहेत. मात्र, दोन्ही मोबाईल अंतर्गत लॉक असल्याने त्यातील माहिती अद्याप पोलिसांना तपासता आलेली नाही. घटनेपूर्वी दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला होता, वादाचे कारण काय होते, तसेच लिशाने टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमकी कोणती परिस्थिती होती, याचा शोध मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे घेतला जाणार आहे.
मोबाईलमधील माहिती समोर आल्यानंतर या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांकडून घटनेची प्रत्येक बाजू तपासली जात आहे.
सध्या पोलिसांनी या घटनेकडे आत्महत्येसह अन्य सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू ठेवला आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थीनीने नेमक्या कोणत्या कारणातून तलावात उडी घेतली किंवा या घटनेमागे आणखी काही कारण होते का, याबाबत निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार आहे. तपासातूनच या दुहेरी मृत्यूमागील नेमके गूढ उलगडणार आहे.

