(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास फॉक्सवॅगन कारचा भीषण अपघात झाला. डोंगरातून रस्त्यावर आलेल्या भल्या मोठ्या दगडावर कार आदळल्यानंतर ती उलटून काही अंतरावर जाऊन थांबली. या अपघातात कारमधील तिघे जण जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी येथून फॉक्सवॅगन कारमधून प्रवासी रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. गुरुवारी मध्यरात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास कार वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ आली असता डोंगरातील मोठ्या दगडावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचे मागील दोन आणि पुढील एक, असे तीन टायर जागीच फुटले. त्यानंतर कारचा ताबा सुटून ती रस्त्यावर उलटली. काही अंतरावर कार गरगरत गेल्यानंतर पुन्हा संगमेश्वरच्या दिशेने तोंड करून थांबली.
अपघातात कारमधील तिघांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघाताच्या ठिकाणी काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मध्यरात्रीचा काळ, महामार्गावरील वेगवान वाहतूक आणि रस्त्यावर आलेला मोठा दगड यामुळे हा अपघात अत्यंत धोकादायक ठरला. मात्र, कारमधील तिन्ही प्रवासी बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघातामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.


