(संगमेश्वर / एजाज पटेल)
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत एकाही उमेदवाराला संधी न दिल्याने जिल्ह्यातील मुस्लिम समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. आज, २१ तारखेला उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपल्याने या यादीत आता बदलाची शक्यता मावळली असून, त्यामुळे असंतोष अधिकच वाढल्याचे चित्र दिसत आहे.
ही नाराजी केवळ अंतर्गत चर्चांपुरती मर्यादित न राहता आता उघडपणे व्यक्त होत आहे. मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व न मिळाल्याने शिंदे गटाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, याचे राजकीय परिणाम पक्षाला भोगावे लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटामध्ये जिल्ह्यातील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून, गेल्या अनेक निवडणुकांत त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले प्रतिनिधित्व असावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आणि आता अर्ज भरण्याची अंतिम मुदतही संपल्यानंतर समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “मतांची गरज असते तेव्हा आम्हाला आठवले जाते, मात्र प्रतिनिधित्व देण्याची वेळ आली की आम्हाला डावलले जाते,” अशी भावना अनेक मुस्लिम कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा कालावधी संपल्याने हा असंतोष थेट मतदानावर परिणाम करू शकतो, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करणे हे शिंदे गटासाठी राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकते, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एकीकडे ‘सर्वसमावेशक राजकारणा’ची भूमिका मांडली जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मुस्लिम समाजाला संधी नाकारली जाते, या दुटप्पी धोरणामुळे शिंदे गटाची विश्वासार्हता प्रश्नांकित होत आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे. उमेदवारी अर्जांची अंतिम मुदत संपल्यानंतर पक्ष नेतृत्व या नाराजीवर काय भूमिका घेते आणि नाराज समाजाला कशा प्रकारे विश्वासात घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

