(राजापूर/ रत्नागिरी)
रक्ताच्या उलट्या झाल्याने प्रकृती बिघडलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रितम दिलीप शेट्ये (वय ३५, रा. आडीवरे वाडापेठ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे खबर देणारे सतीश रावजी करगुंटकर यांच्या शेजारी राहत होते. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी असताना प्रितम शेट्ये यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या. प्रकृती गंभीर झाल्याने सतीश करगुंटकर यांनी त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार रात्री सुमारे १० वाजता प्रितम शेट्ये यांना सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३१ वाजता तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाटे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असून, नाटे पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


