(रत्नागिरी / वार्ताहर)
सह्याद्री हिल मॅरेथॉन स्पर्धेत कोकण कोस्टल मॅरेथॉन (KCM) च्या धावपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. विनायक पावसकर यांनी द्वितीय, तर वैदेही कदम आणि राधा बसणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचावली.
या स्पर्धेत विनायक पावसकर यांनी १० किलोमीटरचे अंतर ५१ मिनिटे २८ सेकंदांत पूर्ण केले. ३६ ते ४५ वयोगटात त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वैदेही कदम यांनी १० किलोमीटरचे अंतर १ तास १२ मिनिटांत पूर्ण करून ४६ ते ५५ वयोगटात तृतीय क्रमांक मिळवला. राधा बसणकर यांनी २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन ३ तास १२ मिनिटांत पूर्ण करत आपल्या वयोगटात तृतीय क्रमांकाची कामगिरी नोंदवली.
या यशामागे कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सुरू असलेला नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. विशेष म्हणजे, टीम कोकण कोस्टलच्या ‘पंचकन्या’ सलग १२० रविवार विनामूल्य प्रॅक्टिस रनचे आयोजन करत आहेत. रेस डायरेक्टर मानसी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक महिला धावपटूंना नियमित सरावाची संधी, मार्गदर्शन आणि स्वतःचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
पंचकन्या टीममध्ये राधा बसणकर, अंकिता पाटकर, केतकी लेले आणि स्नेहल कलाल यांचाही सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमातून महिलांमध्ये धावण्याची आवड निर्माण होण्यासोबतच स्पर्धात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले जात आहे.
दर रविवारी होणाऱ्या सरावादरम्यान धावपटूंना वेग, योग्य पेसिंग, स्टॅमिना, श्वासोच्छ्वासाचे नियोजन आणि धावण्याचे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले जाते. केवळ अधिक अंतर धावण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेचे विश्लेषण करून कामगिरी आणि वेळेत कशी सुधारणा करता येईल, यावरही विशेष भर दिला जातो.
कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सुरू झालेला धावण्याचा प्रवास आता विविध मॅरेथॉन स्पर्धांमधील पोडियमपर्यंत पोहोचला आहे. नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर कोणत्याही वयात धावण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवता येते, हे या धावपटूंनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
दरम्यान, चौथ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन ३ जानेवारी २०२७ रोजी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत हाफ मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी आणि ५ किमी अशा तीन प्रकारांत सहभागी होण्याची संधी धावपटूंना मिळणार आहे. स्पर्धेच्या नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२६ आहे. जास्तीत जास्त धावपटूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


