(जैतापूर / वार्ताहर)
आगामी नवरात्रोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यावेळी उपस्थित मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उत्सव काळातील सुरक्षाव्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
नवरात्रोत्सवाच्या काळात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले. उत्सवादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह देखावे उभारू नयेत, ज्यामुळे सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारांना टाळावे, तसेच मंडळांतील अंतर्गत वादविवाद बाजूला ठेवून एकोप्याने उत्सव साजरा करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने जबाबदारी आणि दक्षता बाळगावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नाटे हा संवेदनशील सागरी किनारपट्टीचा परिसर असल्याने स्थानिक सार्वजनिक मंडळे आणि नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली.
तरुणाईला विळखा घालणाऱ्या अमली पदार्थांविरोधात तसेच व्यसनाधीनतेविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सार्वजनिक मंडळांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध पोलीस सेवांची माहिती देतानाच ‘डायल ११२’ या तत्पर हेल्पलाईन क्रमांकाचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्वयंसेवकांची नियुक्ती करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाने दिले. बैठकीच्या शेवटी पोलिस प्रशासनाकडून सर्व उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीला परिसरातील विविध सार्वजनिक मंडळांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते तसेच पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


