(रत्नागिरी)
युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे २०२६ चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सौ. सायली दीपक राजवाडे यांना प्रदान करण्यात आला. कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात गेली सुमारे तीस वर्षे कार्यरत असलेल्या राजवाडे मॅडम यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १ नोव्हेंबर २०२३ पासून त्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची प्रगती सातत्याने होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना ध्येयपूर्तीसाठी प्रेरित करण्याचे कार्य त्या सातत्याने करत असतात. स्वतःच्या आचरणातून आदर्श निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी प्रभावी संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्यही विशेष उल्लेखनीय आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ-सांगवे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) यांच्या वतीने १२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते. विविध स्तरांतून सौ. राजवाडे मॅडम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

