(रत्नागिरी / वार्ताहर)
विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपले ध्येय निश्चित करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. या वयात घेतलेले निर्णय भविष्यातील आयुष्याला दिशा देतात. मित्रमैत्रिणींच्या आग्रहामुळे नशेचा पहिल्यांदा अनुभव घेण्याचा विचारही करू नका. चुकीचे एक पाऊल संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजग आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्ती अभियानांतर्गत खातू नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाला १५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. नशामुक्तीबाबत कोणतीही माहिती किंवा मदत हवी असल्यास पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. स्वतः व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच आपल्या संपर्कातील व्यक्तींनीही व्यसन करू नये यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आपण मुळच्या हरियाणाच्या असून आयपीएस झाल्यानंतर पहिले पोस्टिंग रत्नागिरीत झाल्याचे अरांक्षा यादव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची मोठी बहीण असल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत सोप्या भाषेत नशेचे दुष्परिणाम समजावून सांगितले आणि नशेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी नशा ही आयुष्यातील समस्यांवर मात करण्याचा मार्ग नसल्याचे सांगितले. आयुष्यात येणाऱ्या अडचणी कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, शिक्षक किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद साधून सोडवाव्यात. संवादातून समस्या सोडवण्याची सवय लावल्यास व्यसनापासून दूर राहण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प केला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. प्रभावी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडत नशामुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष आनंद देसाई, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, संस्थेच्या आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष महेश नाईक, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक दत्तात्रय वालावलकर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


