(रत्नागिरी)
रत्नागिरीच्या लहानग्या विहंग सावंत आणि युवा खेळाडू कौस्तुभ हर्डीकर यांनी अलीकडेच झालेल्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेचे (FIDE) जलद फिडे मानांकन प्राप्त केले आहे.
विहंग सावंत हा सध्या तिसरीत शिक्षण घेत असून त्याने मडगाव (गोवा) येथे पार पडलेल्या ‘युनिटी क्लब तृतीय अखिल भारतीय जलद फिडे मानांकन स्पर्धे’त तीन फिडे मानांकित प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत १४९८ इतके मानांकन मिळवले. बुद्धिबळाचे धडे विहंगला विनोद पावरा यांनी दिले असून, वय, रेटिंग यांचा विचार न करता तो आक्रमक शैलीत खेळत विजयाचे डाव रचतो.
दरम्यान, कौस्तुभ श्रीप्रकाश हर्डीकर या युवा बुद्धिबळपटूने पुण्यात आयोजित ‘एसव्हीआयएस प्रथम खुल्या जलद फिडे मानांकन स्पर्धे’त १४५७ इतके मानांकन मिळवले. कौस्तुभला बुद्धिबळाची विशेष आवड असून कॉलेजच्या अभ्यासासोबतच तो सातत्याने बुद्धिबळातील कौशल्य वाढविण्यासाठी झटतो. हे दोघेही खेळाडू चैतन्य भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी’मध्ये बुद्धिबळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहेत.