(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मित्राला फोन करून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून विचारणा करण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मांडवी बीच येथे घडली. यावेळी एका संशयिताने हातातील लोखंडी फाईटने तरुणाच्या तोंडावर, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वरूप रूपेश दोरखंडे (वय १९, रा. साईनगर, फणसोप हायस्कूलमागे, वरचा फणसोप, रत्नागिरी) यांचा मित्र यश पवार याला रोहन ठिक याने फोन करून शिवीगाळ केली होती. याबाबत स्वरूप यांनी रोहन याला फोन करून विचारणा केली असता त्याने स्वरूप यांनाही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हा वाद प्रत्यक्ष भेटून मिटवण्याचे ठरले. त्यानुसार १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वरूप दोरखंडे व यश पवार हे रोहन ठिक याला भेटण्यासाठी मांडवी बीचवर गेले. त्यावेळी रोहनसोबत त्याचे काही मित्रही तेथे उपस्थित होते.
स्वरूप, यश आणि रोहन यांच्यात बोलणे सुरू असताना अचानक वाद वाढला. यावेळी सोहम पड्यार याने स्वरूप यांना शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यानंतर रोहन ठिक यानेही शिवीगाळ करत स्वरूप यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढ्यावर न थांबता सोहम पड्यार याने त्याच्याकडील लोखंडी हातातील फाईटने स्वरूप यांच्या तोंडावर, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या स्वरूप दोरखंडे यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रोहन ठिक (रा. कोळंबे) आणि सोहम पड्यार (रा. पावस) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.


