( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांना मागील पाच महिन्यांपासूनचे कमिशन न मिळाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवाळीचा सण ओसरून गेला, तरीही शासनाकडून देयके न मिळाल्याने दुकानदार उपजीविकेच्या संकटात सापडले असून तीव्र असंतोष व्यक्त करीत आहेत.
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना धान्यवाटपाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेशनदुकानदारांना पूर्वी १०० किलो धान्यावर १५० रुपये कमिशन मिळत होते. हा दर २० ऑगस्टपासून १७० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला असला, तरी जून महिन्यापासूनचे कमिशन अद्याप थकलेले आहे.
शासनाकडून नियमित देयके मिळत नसल्याने दुकानदारांना रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. “ऐन सणासुदीत काहीतरी मिळेल” या आशेने वाट पाहणाऱ्या दुकानदारांच्या हातात निराशाच आली आहे. वारंवार मागणी करूनही जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने दुकानदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
९५२ दुकानदारांना फटका
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ९५२ रेशन दुकाने असून त्यापैकी ८४२ दुकाने सध्या कार्यरत आहेत. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांतील कमिशन थकित असल्याने सर्व दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधारच हे कमिशन असल्याने शासनाने तातडीने थकबाकीची रक्कम मंजूर करावी, अशी मागणी दुकानदार संघटनांकडून करण्यात येत आहे.

