(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील जेल रोड परिसरात ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचा साठा बाळगणाऱ्या साखरी नाटे येथील २१ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ऑल आऊट ऑपरेशनअंतर्गत सुरू असलेल्या नाकाबंदीवेळी ही कारवाई करण्यात आली. संशयिताकडून सुमारे ६० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ, मोबाइल आणि दुचाकीसह एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नुफेरअली खालिद तांडेल (वय २१, रा. गाजी मोहल्ला, वरचा वाडा, साखरी नाटे, ता. राजापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी जेल रोड नाका परिसरात पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना तो संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्लास्टिक पिशवीसह सुमारे सहा ग्रॅम वजनाचा, तर निव्वळ चार ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याच्या एकूण १२० पुड्या तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक पुडीची किंमत सुमारे ५०० रुपये असल्याने या पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे ६० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पुड्या बांधण्यासाठी वापरण्यात येणारे १२० कागदी तुकडे, सुमारे पाच हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा मोबाइल आणि एक लाख रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस दुचाकीही पोलिसांनी जप्त केली.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६४/२०२६ अन्वये अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थांबाबतच्या (NDPS) कायद्यातील कलम ८(क) आणि २१(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती परिसरात अमली पदार्थांच्या कथित विक्रीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, त्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का आणि या व्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आता पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.


