(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर बंदिस्त राहिलेल्या बिबट्याने दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडताच थेट महिलेवर झेप घेतल्याची घटना घडली. या प्रसंगात मीना धोंडू सुवरे यांच्या चेहऱ्याला बिबट्याचे नख लागल्याने त्या जखमी झाल्या. सुदैवाने या हल्ल्यातून त्यांचा जीव वाचला. घराशेजारीच घडलेल्या या घटनेमुळे सुवरेवाडीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मीना सुवरे यांच्या घराशेजारी कोंबड्यांसाठी चिरेबंदी खोली बांधण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर कोंबड्या या खोलीत जातात. त्यानंतर घरातील सदस्य दरवाजा बंद करतात. घटनेच्या दिवशी दरवाजा बंद करण्यापूर्वी बिबट्या कोणत्या तरी मार्गाने खोलीत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याची कोणालाही कल्पना नसल्याने घरातील सदस्यांनी नेहमीप्रमाणे खोलीचा दरवाजा बंद केला. त्यामुळे बिबट्या संपूर्ण रात्र त्या खोलीतच अडकून राहिला.
रात्रभर खोलीत बंदिस्त असलेल्या बिबट्याने तेथील सर्व कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. मात्र, खोलीत बिबट्या असल्याचा संशय घरातील कोणालाही आला नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मीना सुवरे कोंबड्यांना बाहेर सोडण्यासाठी आणि नेहमीची कामे करण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडायला गेल्या. दरवाजा उघडल्यानंतर कोंबड्या बाहेर येतील, अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु, समोर बिबट्या असल्याचे दिसताच त्या हादरून गेल्या.
दरवाजा उघडताच खोलीतून बाहेर पडण्यासाठी बिबट्याने थेट बाहेरच्या दिशेने झेप घेतली. या वेळी त्याचा पंजा आणि नख मीना सुवरे यांच्या चेहऱ्याला लागल्याने त्या जखमी झाल्या. काही क्षणांत घडलेल्या या घटनेने त्यांची घाबरगुंडी उडाली. मात्र, बिबट्याने पुन्हा हल्ला न करता जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने मोठी जीवितहानी टळली.
घटनेनंतर स्थानिकांनी जखमी मीना धोंडू सुवरे यांना तातडीने फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या चेहऱ्यावरील जखमेवर उपचार करून आवश्यक प्राथमिक वैद्यकीय मदत दिली.
या घटनेची माहिती परिसरात पसरताच सुवरेवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. घराच्या अगदी जवळ असलेल्या कोंबड्यांच्या चिरेबंदी खोलीत बिबट्या रात्रभर लपून राहिल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
परिसरातील जनावरांचे गोठे, कोंबड्यांच्या खोल्या आणि आडोशाच्या जागांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वनविभागाने परिसरात तातडीने पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुवरेवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


