(देवरूख / सुरेश सप्रे)
शिवसेनेतील फाटाफुटीनंतर गेली तब्बल ३३ वर्षे पंचायत समितीवर सत्ताधारी असलेल्या उबाठा सेनेला सत्तेवरून खाली खेचण्यात महायुतीला यश येणार का, याकडे संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे. बदललेली राजकीय समीकरणे, पक्षांतर, आघाड्या आणि प्रतिष्ठेच्या लढतींमुळे यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अधिकच रंगतदार ठरत आहे.
धामापूर जि.प. गटात चौरंगी लढत, खरा मुकाबला उबाठा विरुद्ध राष्ट्रवादी
धामापूरमार्फत संगमेश्वर जिल्हा परिषद गटात उबाठाकडून मागील निवडणुकीत विजयी झालेले, मात्र नंतर राजीनामा देत पक्ष बदललेले सहदेव बेटकर पुन्हा घरवापसी करत रिंगणात उतरले आहेत. २०१९ मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री भास्कर जाधव यांना जोरदार टक्कर देणारे बेटकर यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुशील भायजे, वंचितचे अजित कांबळे आणि अपक्ष जगन्नाथ राऊत यांच्याशी चौरंगी लढत आहे. तरीही ही लढत उबाठा आणि राष्ट्रवादी यांच्यातच निर्णायक ठरेल, असे चित्र असून विद्यमान आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा या गटात पणाला लागली आहे.
कडवई गटात उबाठा विरुद्ध भाजप संघर्ष
उबाठा सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कडवई गटात तिरंगी लढत होत असून माजी जि.प. उपाध्यक्ष व उबाठाचे आक्रमक नेतृत्व संतोष थेराडे यांची खरी लढत भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के आणि काँग्रेसचे आशिष सुर्वे यांच्याशी होणार आहे.
कसबा संगमेश्वर गटात महाडिक विरुद्ध कुवळेकर
कसबा संगमेश्वर गट हा १९९२ पासून राजू महाडिक यांचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी त्यांच्या पत्नी व माजी जि.प. अध्यक्ष रचना महाडिक शिवसेनेकडून रिंगणात असून त्यांची थेट लढत उबाठाच्या विशाखा कुवळेकर यांच्याशी आहे. लढत एकतर्फी वाटत असली तरी उबाठाची संघटनशक्ती तसेच कुणबी आणि मुस्लिम फॅक्टर कसा प्रभाव टाकतो, यावरच निकाल अवलंबून असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मुचरी, कोसुंब, साडवली गटात प्रतिष्ठेच्या लढती
मुचरी गटात महायुतीच्या माजी जि.प. सदस्या माधवी गीते यांच्यासमोर उबाठाच्या नवख्या पण उच्चशिक्षित व आक्रमक सामाजिक कार्यकर्त्या ललिता तांबे उभ्या ठाकल्या आहेत. अपक्ष उमेदवार नृपूर मुळे यांची सामाजिक कामातील सक्रियता निकालाचे गणित बदलू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.
कोसुंब गटात तिरंगी लढत असून उबाठाच्या मुग्धा जागुष्टे रिंगणात आहेत. मात्र येथे शिवसेना आणि भाजप आमनेसामने असून भाजपाचे प्रमोद अधटराव व माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांच्यात मैत्रीपूर्ण संघर्ष दिसत आहे. माजी आमदार सुभाष बने यांची राजकीय ताकद या लढतीत कसोटीला लागली आहे.
साडवली गटात भाजपकडून रुपाली कदम या नवख्या उमेदवार असल्या तरी त्या माजी जि.प. अध्यक्ष रश्मी कदम यांच्या सुनबाई आणि भाजप तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्या पत्नी आहेत. त्यांच्यासमोर उबाठाकडून माजी मंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी व जि.प. सदस्या नेहा माने उभ्या असून या गटात दोन राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
इतर गणांमध्येही रंगतदार सामने
धामापूर गणात उबाठाचे अजय चव्हाण विरुद्ध भाजपाचे महेश जड्यार, आरवली गणात उबाठाच्या स्मिता कुंभार विरुद्ध राष्ट्रवादीच्या प्रिया बेर्डे, कडवई गणात उबाठाच्या अपर्णा जाधव विरुद्ध शिवसेनेच्या सुचिता कदम, तर धामणी गणात राष्ट्रवादीचे संतोष भडवळकर विरुद्ध उबाठाचे दत्ताराम लाखण अशी चुरशीची लढत होत आहे.
कसबा गणात शिवसेनेचे सुरेश माईन यांच्यासमोर उबाठाचे चंद्रकांत फणसे व अपक्ष संदेश झिमण यांचे आव्हान आहे. परचरी गणात शिवसेनेच्या शर्वरी वेल्ये विरुद्ध उबाठाच्या पूजा शितप, माभळे गणात शिवसेनेच्या सुहास मायंगडे विरुद्ध उबाठातून भाजपात गेलेले दिलीप गीते अशी लढत रंगत आहे. येथे राजकीय घडामोडींमुळे मायंगडे यांचा मार्ग सुकर होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
मुचरी गणात उबाठाच्या प्रज्ञा गमरे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या आरूची घवाळी, कोसुंब गणात उबाठाच्या सुहासिनी भाताडे विरुद्ध भाजपाच्या दूर्वा पाष्टे, तर निवे गणात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल बाईत विरुद्ध उबाठाचे सुरेश गुरव अशी थेट लढत होणार आहे.
साडवली गणात शिवसेनेचे आक्रमक नेते सचिन मांगले यांच्या पत्नी तृप्ती मांगले विरुद्ध उबाठाच्या युवासेना नेत्या क्षमा जाधव यांच्यात सामना असून या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे. हातीव गणात राष्ट्रवादीचे मंगेश बांडागळे विरुद्ध उबाठाचे प्रदीप ढवळ, तर कोंडगाव गणात शिवसेनेचे जयसिंग माने विरुद्ध उबाठाचे तरुण नेतृत्व विद्यासागर तांदळे अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे. दाभोळे गणात उबाठाचा उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या दिपाली जाधव यांचा मार्ग तुलनेने सुकर मानला जात आहे.
या निवडणुकीत सहा गणांमध्ये उबाठा विरुद्ध शिवसेना, पाच गणांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध उबाठा, तर दोन गणांमध्ये भाजप विरुद्ध उबाठा अशा थेट लढती होत असून देवरूख पंचायत समितीवर ३३ वर्षांनंतर सत्तांतर होणार का, याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे.

