उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात सध्या ३०८ चाकांचा लांबलचक ट्रक चर्चेचा विषय ठरला आहे. या महाकाय ट्रकमधून तब्बल २०० टन वजनाचे वेसल वाहून नेले जात आहे. बेल्जियममधील अँटवर्प बंदरातून समुद्रमार्गे भारतात आणण्यात आलेले हे वेसल ओडिशातील पारादीप बंदरातून उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील साखर कारखान्याकडे नेले जात आहे. सध्या हा ट्रक चंदौली येथे असून, पुढील प्रवासासाठी आवश्यक परवानगी तसेच मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
पारादीप बंदरापासून पुढील वाहतुकीसाठी विशेष हायड्रोलिक ट्रेलरचा वापर करण्यात आला आहे. बलरामपूर येथील साखर कारखान्यातील इथेनॉल प्लांटमध्ये हे वेसल बसवण्यात येणार आहे. या वेसलमध्ये व्हॅक्यूम बॉयलरसारखी जड औद्योगिक उपकरणे आहेत. त्यामुळे त्याची वाहतूक करण्यासाठी विशेष क्षमतेच्या ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे.
या महाकाय ट्रकची लांबी जवळपास १०० फूट असून रुंदी ७ मीटर आहे. त्याला तब्बल ३०८ चाकं आहेत. वेसलचे वजन आणि ट्रकचा आकार लक्षात घेता सामान्य रस्त्यांवरून त्याची वाहतूक करणे आव्हानात्मक ठरत आहे. मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी काही ठिकाणी रस्ते रुंद करावे लागत आहेत. तसेच वीजेचे खांब, स्ट्रीट लाइट आणि फूट ओव्हर ब्रीजही हटवावे लागत आहेत.
या ट्रकचा प्रवास अत्यंत कमी वेगाने सुरू आहे. सामान्य परिस्थितीत तो दिवसाला केवळ १० ते १२ किलोमीटर अंतर कापतो. मार्गात कोणताही अडथळा नसल्यास दिवसाला २० किलोमीटरपर्यंत प्रवास केला जातो. त्यामुळे पारादीपपासून बलरामपूरपर्यंतचा हा प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
या महाकाय वाहनाच्या इंधनाच्या खर्चाचीही चर्चा होत आहे. ३०८ चाकांच्या या ट्रकला दर दिवशी २०० लीटरपर्यंत डिझेल लागते. ट्रकचे एक चालक सुरेश चंद्रा यांनी सांगितले की, आतापर्यंत डिझेलसाठी २ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या ट्रकसोबत १४ वाहनांचा ताफाही प्रवास करत आहे. त्यामध्ये जेसीबी, हायड्रा, क्रेन, ट्रेलर तसेच टेक्निकल टीमच्या वाहनांचा समावेश आहे. या संपूर्ण वाहतूक व्यवस्थेसोबत 40 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
पारादीप बंदरातून सुरू झालेला हा प्रवास ओडिशानंतर झारखंड आणि बिहारमार्गे उत्तर प्रदेशात दाखल झाला. बिहारमधील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत हा ताफा चंदौली आणि त्यानंतर वाराणसीपर्यंत पोहोचला आहे. पुढील टप्प्यात गाजीपूर, आजमगड आणि उत्तर प्रदेशातील इतर भागांतून प्रवास करत हे वेसल बलरामपूर साखर कारखान्यात पोहोचणार आहे.
निर्मितीतील विशेष तांत्रिक गरजा असल्याचे हे वेसल भारतातच तयार न करता बेल्जियममधून आयात करण्यात आले. हे उपकरण सामान्य टाकी किंवा बॉयलर नसून उच्च दाब, उच्च तापमान आणि रसायनांचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेले अत्याधुनिक औद्योगिक उपकरण आहे. त्यासाठी विशेष सामग्री तसेच अचूक वेल्डिंग तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. अशा उपकरणांचे उत्पादन युरोपमध्ये विशेष तंत्रज्ञानाच्या आधारे केले जाते. त्यामुळे हे वेसल बेल्जियममधून आयात करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.


