(पुणे)
महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे गणपती. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा रुजली आणि आजही गणेशोत्सव म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुण्याकडे वेधलं जातं. दगडूशेठ हलवाईसारख्या मानाच्या गणपतींबरोबरच पुण्याच्या मध्यवर्ती भागात अनेक ऐतिहासिक व कलात्मक मंदिरं अस्तित्वात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सोमवार पेठेतील ‘श्री त्रिशुंड गणपती मंदिर’ स्थापत्यकलेचा आणि अध्यात्माचा संगम असलेलं एक अद्वितीय मंदिर.
१७व्या शतकातील वास्तुशैली आणि त्रिशुंड गणेशाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती
ही मूर्ती महाराष्ट्रात दुर्मीळ असून तीन सोंडा, सहा हात, आणि मांडीवर विराजमान रिद्धी-सिद्धी यांसह त्रिशुंड गणेश विराजमान आहेत. काळ्या पाषाणात कोरलेली ही अत्यंत सूबक मूर्ती, गणपतीला मोरावर बसवते. एका सोंडेचा स्पर्श शक्तिस्वरूप देवीच्या हनुवटीला तर दुसऱ्या सोंडेचा लाडूवर आहे. या मूर्तीचं सौंदर्य, कलात्मकता आणि अध्यात्मिक तेज यामुळे मंदिरात पावित्र्याचं वातावरण अनुभवायला मिळतं.
वर्षातून एकदाच खुलं होणारं तळघर
या मंदिरातील विशेष वैशिष्ट्य म्हणजे याचं तळघर, जे दरवर्षी फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडलं जातं. त्रिशुंड गणपती मंदिराचं तळघर खोलात असून, ते गुडघाभर थंड पाण्याने भरलेलं असतं. या तळघरात जीवंत झरा आहे. छतावर दगडी झुंबर, योगसाधनेसाठी स्वतंत्र खोली, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दलपतगिरी गोसावी यांची समाधी यामुळे हे ठिकाण भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचं आणि शांततेचं केंद्र बनतं. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक या समाधीचं आणि तळघराचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मंदिराचे ट्रस्टी प्रकाश लांडगे यांच्या माहितीनुसार, ही परंपरा दलपतगिरी गोसावी यांचे शिष्य सुरू ठेवत आहेत.
ऐतिहासिक शिल्पकलेचा अद्वितीय खजिना
1754 मध्ये धामपूर (इंदूरजवळ) येथील भीमगिर गोसावी यांनी हे मंदिर बांधले. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर कोरलेली शिल्पं हे येथील आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे.
यामध्ये:
-
गणपती, गजलक्ष्मी, शिव-पार्वती, कृष्ण (बासरीसह), पोपट
-
एकशिंगी गेंडा, इंग्रज सैन्य, माकडांची रांग, महिलांची शिल्पं
-
हठयोगी साधना, घंटानाद, सूर्य-चंद्र, मानवी भावाभिव्यक्ती असलेली चेहरे
-
गुजराती शैलीतील झरोके
या शिल्पांमधून तत्कालीन धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक आयुष्याचे सुंदर प्रतिबिंब पाहायला मिळते.
त्रिशुंड मंदिर – हठयोग साधनेचं केंद्र
या मंदिराचा इतिहास पाहता, हे पूर्वी हठयोग साधना केंद्र असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या कोरीवकामात विविध योगमुद्रा दिसतात. त्यामुळे इथे अध्यात्म आणि साधनेचं वातावरण अधिक प्रभावीपणे जाणवतं. शहरातील सोमवार पेठेतील हे मंदिर एक शांततेचं आणि आध्यात्मिकतेचं केंद्र आहे. त्याचं वास्तुशिल्प, मूर्तीचं सौंदर्य आणि पाण्यानं भरलेलं तळघर हे सगळं मिळून एक अद्वितीय अनुभव देतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वर्षातून एकदाच उघडणाऱ्या तळघरामुळं श्रद्धाळूंमध्ये या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्रिशुंड गणपती मंदिर पाहण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस हा एकमेव संधी असतो. त्यामुळे या दिवशी मंदिराला भेट देणं हा एक अपूर्व आध्यात्मिक अनुभव असतो