(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका शांततापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी सर्वसमावेशक नियमावली आणि रूपरेषा निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती गठित केली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ तसेच २०१८ च्या एकरूप परिनियमांनुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका घेण्याची तरतूद आहे. मात्र, या तरतुदींच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील आव्हाने, कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न आणि बाह्य राजकीय हस्तक्षेप रोखण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षण संचालनालयाने अभ्यास समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सरकारने ही समिती स्थापन केली आहे.
समितीला सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये व्यापारीकरण आणि राजकीय हस्तक्षेप रोखण्यासोबतच विविध घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठीही समिती धोरणात्मक शिफारसी करणार आहे.
महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळावे, याबाबत समितीच्या शिफारसी असतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतदानापर्यंतच्या प्रक्रियेत डिजिटल प्रणालीचा वापर करण्याबाबतही रूपरेषा तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर निधीचे पारदर्शक ऑडिट आणि निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींसाठी विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था याबाबतही समिती मार्गदर्शन करणार आहे.
या समितीत शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अध्यक्ष डॉ. सुहास पेडणेकर यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. प्रशांत अमृतकर, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात, एस.पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, प्रा. डॉ. प्रशांत साठे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार आणि विधी तज्ज्ञ डॉ. परवीन सय्यद यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
समितीच्या शिफारसींच्या आधारे राज्यातील विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी नियमावली आणि निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.


