जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या भक्तगणांनी जम्मू परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या सेवाभावाने मदतीचा हात दिला. ऑगस्ट अखेरीस जम्मू आणि आसपासच्या भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीनंतर प्रभावित नागरिकांना १२५ ताडपत्री आणि ३०० ब्लँकेटचे मोफत वाटप करण्यात आले.
अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जम्मू शहरासह अनेक खेड्यांमध्ये पूराचे पाणी घरांमध्ये घुसले होते. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले, तर काहींची घरे पूर्णपणे कोसळली. जनजीवन विस्कळीत झालेल्या या परिस्थितीत, “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्वज्ञानातून प्रेरित होऊन रामानंदाचार्य संप्रदायाने पुढाकार घेतला.
२ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जम्मू जिल्ह्यातील गुज्जर बस्ती (जम्मू युनिव्हर्सिटी जवळ), जम्मू सिटी, मढ (ता. नगरोटा), कैरी (ता. भलवाल), आणि पढुण ऐथम (ता. जम्मू) या भागांत पूरग्रस्तांना ताडपत्री व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
ही सेवा उपक्रम मोहीम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडली. मदत वितरणासाठी रामानंद संप्रदायाचे गुरुसेवक — दिलीप जाधव, अनिल तारकर, शंकर कारकर, मिलिंद मोगरे, दीपक मोरे, संतोष आंबोळकर, सत्यवान दानवले आणि अन्य अनेक सेवाभावी कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमात जम्मू येथील माजी मुख्याध्यापक जगदीश राज, कैरीचे सरपंच निशेतर सिंह, मढचे माजी सरपंच सतपाल नसीब सिंह, तसेच राजेशकुमार डोगरा, बलराम, श्रीमती अंजु डोगरा, श्रीमती रेणू देवी, श्रीमती अंजु देवी, श्रीमती रजनी देवी, बजालता मंडळाचे प्रधान शिव कुमार, अजय कुमार शर्मा, विष्णू सिंह, सुवर्णसिंग आणि ब्रिजलाल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
जम्मूतील पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि कृतज्ञतेचा भाव निर्माण करणारा हा उपक्रम म्हणजे रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सेवाधर्माची जिवंत प्रचिती असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

