(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, ही यादी अंतिम करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेच्या आगामी निवडणुकीच्या हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ अब अन्वये तसेच सहकार प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था, कोकण विभाग) यांनी यासंदर्भात जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी; विभागीय सहनिबंधक कार्यालय, नवी मुंबई; जिल्हा उपनिबंधक कार्यालय; जिल्ह्यातील तहसीलदार व सहायक निबंधक कार्यालये तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित अधिकृत संकेतस्थळांवरही ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादीतील नोंदींबाबत सभासदांना काही हरकत किंवा आक्षेप असल्यास १ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ते सादर करता येणार आहेत. विभागीय सहनिबंधक कार्यालय, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे तसेच संबंधित ई-मेलवर आक्षेप नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. १३ ऑक्टोबरनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील नोंदींबाबत आक्षेप असलेल्या सभासदांना निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेपांची छाननी करून त्यावर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी निर्णय घेणार आहेत. ही प्रक्रिया २२ ऑक्टोबर २०२६पर्यंत पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आक्षेप नोंदविणाऱ्या सभासदांनी अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सुनावणीची नोटीस स्पीड पोस्टबरोबरच ई-मेल आणि व्हॉट्सअॅपद्वारेही पाठविण्यात येणार आहे.
टपालाद्वारे नोटीस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता लक्षात घेता, डिजिटल माध्यमातून पाठविलेली नोटीस अधिकृत समजून निर्धारित वेळेत सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आदिनाथ दगडे यांनी केले आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, आता हरकती आणि आक्षेपांच्या छाननीनंतर अंतिम मतदार यादीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर निवडणुकीच्या पुढील टप्प्याला प्रत्यक्ष वेग येणार आहे.


