( रत्नागिरी /प्रतिनिधी )
मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरुववाडी परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या अपघातात चिरे भरलेला टेम्पो अनियंत्रित होऊन मार्गिकेवरून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. सुदैवाने या भीषण प्रसंगात चालक मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. महामार्गावरील काँक्रीटीकरण केलेल्या मार्गिकेवरून टेम्पो जात असताना तोल सुटल्याने टेम्पो दुभाजक ओलांडत पलटी झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या घटनेनंतर हातखंबा महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक पलटी होऊनही चालक सुरक्षित बाहेर पडला ही दिलासादायक बाब आहे. पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. परंतु डेंजर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदाराकडून होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष प्रकर्षाने जाणवत आहे. रस्त्याच्या निकृष्ट व्यवस्थापनामुळे यापूर्वीही या ठिकाणी अनेक गंभीर अपघात घडले असून, त्यात जीवितहानीसह अनेक जखमींची नोंद आहे. तरीदेखील प्रशासन किंवा ठेकेदार यांच्याकडून कोणतीही प्रभावी सुधारात्मक उपाययोजना राबवली जात नसल्याचे वास्तव दिसून येते.
RTO विभागाचे दुर्लक्ष का?
वाहतूक नियमांना केराची टोपली दाखवत, या मार्गावर चिरे, खडी, वाळू टेम्पो व अन्य वाहने रोजच्याप्रमाणे बेदरकारपणे भरधाव वेगाने मार्गक्रमण करताना दिसतात. अशा धोकादायक परिस्थितीतही तपासणी, नियंत्रण आणि कारवाईकडे RTO विभागाचे दुर्लक्ष का होते? असा सवाल उपस्थित होत आहे. सततच्या अपघातांनी वेढलेल्या या संवेदनशील पट्ट्यात कडक शिस्त, सुरक्षाविषयक उपाय आणि सातत्यपूर्ण देखरेख यांची तातडीची आवश्यकता असल्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पोलिसांच्या समोरून ओव्हरलोड वाहतूक
हातखंबा महामार्ग वाहतूक पोलिसांच्या अगदी समोरून ओव्हरलोड वाहने निर्धास्तपणे मार्गक्रमण करत असल्याचे गंभीर चित्र सतत पाहायला मिळते. वाहतूक सुरक्षेच्या नियमांना सर्रास धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकाराकडे संबधित यंत्रणा दुर्लक्ष का करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. महामार्गावरील संवेदनशील पट्ट्यात वजनापेक्षा कितीतरी अधिक माल भरून जाणारी वाहने बेफिकिरीने धावत असून, अशा वाहनांमुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो. यामागे चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष केल्याचे प्रकार होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या आरोपांमुळे संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महामार्गासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावर कायदा व सुव्यवस्थेला तिलांजली देत ओव्हरलोड वाहनांना मोकळा रस्ता देण्याची प्रवृत्ती सुरू राहिल्यास गंभीर दुर्घटना अपरिहार्य ठरणार आहेत. महामार्ग सुरक्षा, नियमबद्ध वाहतूक आणि जबाबदार प्रशासन या तिन्हींच्या दृष्टीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी कारवाई करण्याची गरज आहे.

