(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शारदीय नवरात्रोत्सवाच्या आगमनाने जिल्हा उत्सवी जल्लोषाने नटला आहे. सोमवार, दि. २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला शुभारंभ होत असून, अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आरंभ झालेला हा उत्सव दसऱ्याच्या विजयादशमीपर्यंत (दि. २ ऑक्टोबर) भक्तिभावात पार पडणार आहे.
या निमित्ताने जिल्ह्यात एकूण ५०१ ठिकाणी दुर्गामूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यामध्ये ४३६ सार्वजनिक व ६५ खासगी मंडळांचा समावेश असून, देवीप्रतिष्ठापनेसाठी मंडळांकडून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मूर्तिकारांकडून दुर्गामातेच्या मूर्तींना अंतिम रंगसजावट दिली जात असून, मंडळांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच ४२४ सार्वजनिक ठिकाणी घटस्थापना केली जाणार असून, तब्बल १९,३१५ घरांमध्ये खासगी घटस्थापना केली जाणार आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात देवीभक्तीचा जल्लोष अनुभवास येत असून, सजावट, प्रकाशयोजना व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीने गावागावांत उत्सवी रंग भरले आहेत.
नवरात्रोत्सव म्हटला की दांडिया-गरबा हे अविभाज्य अंग. जिल्ह्यात ठिकठिकाणी दांडिया महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी स्पर्धांचेही आयोजन होत असल्याने दांडिया मंडळांचा सराव जोरात सुरू आहे. पारंपरिक पोशाख, फॅन्सी दांडिया स्टिक्स, इमिटेशन दागिने, पूजासाहित्य यामुळे बाजारपेठाही रंगतदार झाली आहे. रत्नागिरी जिल्हा सध्या भक्तिरसात व संस्कृतीच्या झगमगाटात न्हालेला असून, देवीप्रतिष्ठापनेपासून दांडियाच्या तालापर्यंत सर्वत्र नवरात्रोत्सवाची उत्सवी चाहूल लागली आहे.

