(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रेल्वे स्थानकापासून खेडशीपर्यंतच्या महामार्गालगत उभारण्यात आलेले पथदिवे सध्या बहुतांश ठिकाणी बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. सुरुवातीच्या काळात हे दिवे नियमितपणे सुरू केले जात होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्गाचा परिसर प्रकाशाने उजळून निघत होता. मात्र, आता पथदिव्यांनी जणू प्रकाश देण्याऐवजी केवळ शोभेपुरते उभे राहण्याची भूमिका स्वीकारली आहे.
महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच काही ठिकाणी रस्त्यावर गुरांचा ठिय्या असतो. अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे वाहनचालकांना उशिरा निदर्शनास येण्याची शक्यता असते. रस्ता ओलांडणारे पादचारी, दुचाकीस्वार तसेच रस्त्याच्या कडेला असलेले अडथळेही पुरेशा प्रकाशाअभावी स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे पथदिवे केवळ सौंदर्यीकरणाचा भाग नसून रात्रीच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेशी निगडित महत्त्वाची सुविधा आहे. विशेष म्हणजे, सायंकाळच्या सुमारास हे पथदिवे सुरू केले जातात, त्या वेळी रेल्वे स्थानक ते खेडशीपर्यंतचा मार्ग अक्षरशः प्रकाशमय होतो. रस्त्याच्या दुतर्फा उजेड पडल्याने वाहनचालकांना पुढील मार्ग स्पष्ट दिसतो. रस्त्यावर गुरे असोत किंवा अचानक रस्ता ओलांडणारा पादचारी अशा संभाव्य धोक्यांची वेळीच जाणीव होण्यास या प्रकाशव्यवस्थेची मोठी मदत होते. मग हा प्रकाश अधूनमधूनच दाखवायचा असेल, तर पथदिवे उभारण्याची एवढी घाई कशासाठी, असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.
लाखो रुपये खर्चून सुविधा उभारायची आणि त्यानंतर दुर्लक्षाने बंद अवस्थेत ठेवायची, ही कार्यपद्धती नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. महामार्गावर पथदिव्यांची व्यवस्था उभी राहिल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा साहजिकच वाढल्या आहेत. मात्र, दिवे बंद राहिल्याने उभारलेली सुविधा असूनही तिचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. महामार्गावरील प्रकाशव्यवस्था नियमितपणे कार्यरत ठेवणे, बंद दिव्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि संपूर्ण मार्गाची पाहणी करणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या ठिकाणी रात्री गुरांचा वावर किंवा ठिय्या असतो, त्या भागात पुरेसा प्रकाश उपलब्ध असणे अधिक महत्त्वाचे आहे.
ठेकेदार कंपनीने लक्ष देण्याची मागणी
महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदार कंपनीने पथदिव्यांच्या सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून बंद दिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. रस्ता तयार करणे एवढीच जबाबदारी नसून, उभारलेल्या सुविधांची नियमित देखभाल आणि त्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महामार्गावर रात्री पुन्हा प्रकाश पडणार की पथदिवे असेच अंधारात उभे राहणार, हा प्रश्न आता संबंधित यंत्रणेच्या कार्यवाहीकडे लागला आहे.


