(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जि. प. कळझोंडी धरण येथील जयगड प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने लेखी निवेदन सादर करण्यात आले.
कळझोंडी धरण येथील जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेवर सुमारे १५ कंत्राटी कर्मचारी गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. जयगड, सांडे-लावगण, कासारी, चाफेरी, वाटद, खंडाळा, जांभारी, कळझोंडी, कोळीसरे, वरवडे, सैतवडे, सत्कोंडी आदी सुमारे ३० ते ३५ किलोमीटर परिसरातील गावांना या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
या योजनेअंतर्गत अनेक पाण्याच्या टाक्या दुर्गम व जंगलमय भागात उभारण्यात आल्या आहेत. या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर असतानाही कर्मचारी जीवाची पर्वा न करता सातत्याने सेवा देत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, एवढी वर्षे सेवा बजावूनही कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २२ जूनपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत प्रथमेश गावणकर यांनी सांगितले की, “सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास कंत्राटी कर्मचारी आपल्या कुटुंबासह कळझोंडी धरणावर जलसमाधी घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.”
रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता संबंधित वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फोटो : उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर व कंत्राटी कर्मचारी.

