(रत्नागिरी / वार्ताहर)
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी रत्नागिरी जिल्ह्यात निःस्वार्थपणे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी यांना ‘पर्यटन मित्र पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पर्यटन सहकारी सेवा संस्था – समूह मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
२७ सप्टेंबर २०२६ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात गडकिल्ले संवर्धनाची मोहीम राबवून केलेल्या विशेष कार्याबद्दल प्रतिष्ठानला हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. गड-किल्ल्यांची स्वच्छता, त्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारशाचा अभ्यास तसेच पुढील पिढीपर्यंत दुर्गवैभवाची ओळख आणि जपणूक पोहोचविण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.
हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा किंवा मोजक्या कार्यकर्त्यांचा नसून, गड-किल्ले संवर्धनाच्या कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येक मावळा आणि रणरागिणीचा गौरव असल्याची भावना प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली. गडकोटांच्या संवर्धनासाठी सुरू असलेला हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, या कार्यात अधिकाधिक मावळे आणि रणरागिणींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.
‘आयुष्याचा एकच प्रण… गडकिल्ले संवर्धन!’ या ध्येयाने गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रत्नागिरी विभागाच्या माध्यमातून गड-किल्ले संवर्धनाचा हा प्रवास पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


