जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न नसल्यामुळे घरबांधणीसाठी पाण्याची उपलब्धता ही अडचण नाही. मात्र, सिमेंट, स्टील, वाळू यांसह अन्य बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमतींनी लाभार्थ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत केले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करताना अनेकांना बांधकाम थांबवावे लागत आहे. त्यात मजुरांची वाढती मजुरी आणि साहित्याच्या किमती यामुळे मंजूर अनुदानापेक्षा अधिक रक्कम स्वतः खर्च करावी लागत आहे. काही लाभार्थ्यांना घराचे काम पूर्ण करण्यासाठी कर्जाचाही आधार घ्यावा लागत आहे.
घरकुल मंजुरी आणि प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्यातील दरी आकडेवारीतूनही स्पष्ट होत आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात सुमारे १७ हजार घरकुलांना मंजुरी मिळाली असताना प्रत्यक्षात केवळ सात हजार घरकुले पूर्ण झाली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १७ हजार ८२० घरकुलांपैकी १७ हजार ८१९ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ २ हजार ४२१ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मंजुरी मिळूनही हजारो कुटुंबांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
दरम्यान, घरकुलांची अपूर्ण कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांमार्फत बांधकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला जात असून, लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासोबतच रखडलेल्या कामांना गती देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून घरकुलांची कामे पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.
मात्र, केवळ प्रशासकीय पाठपुराव्याने हा प्रश्न सुटणार नाही. बांधकाम साहित्याचे वाढते दर आणि अनुदानाचे हप्ते वेळेत मिळण्याची आवश्यकता लक्षात घेता लाभार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. घरकुल मंजूर होणे ही गरीब कुटुंबांसाठी नव्या आयुष्याची आशा असते; परंतु प्रत्यक्ष घर उभे राहून गृहप्रवेश होईपर्यंत त्यांचा संघर्ष कायम राहतो.
त्यामुळे नव्या घरकुलांना मंजुरी देण्याबरोबरच आधीच मंजूर झालेली आणि अर्धवट राहिलेली बांधकामे पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना पुरेसे आर्थिक पाठबळ मिळाल्यास हजारो कुटुंबांना हक्काचे छप्पर मिळू शकते. पुढील दिवाळी तरी या कुटुंबांना पडक्या किंवा भाड्याच्या घराऐवजी स्वतःच्या नव्या घरात साजरी करता यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


