(नाशिक / प्रतिनिधी)
दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात श्रीक्षेत्र वेरुळ (संभाजीनगर) येथे भगवान श्रीघृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पवित्र भूमीवर श्री चक्रराज यंत्र पूजन आणि अतिरुद्र पठण सेवा आयोजित करण्यात आली आहे.
पौष कृष्ण अष्टमी मंगळवार दि.21 जानेवारी 2025 रोजी ही अति उच्च कोटीची सेवा संपन्न होणार आहे. परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी यापूर्वीही अखिल सेवेकरी परिवाराला सोबत घेऊन विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राष्ट्राची प्रगती आणि मानवी जीवन सुखी-समाधानी होण्यासाठी विविध आध्यात्मिक आणि सेवाभावी उपक्रम यशस्वी केले. याच श्रृंखलेमध्ये नूतन वर्षाच्या प्रारंभी श्रीक्षेत्र वेरुळ (संभाजीनगर) येथे श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन आणि श्री अतिरुद्र पठण सेवा पार पडणार आहे.
मानवी जीवनात अर्थ आणि आरोग्य लाभणे ही महत्त्वाची बाब मानली जाते आणि श्रीचक्रराज श्रीयंत्र हे प्रामुख्याने धनलक्ष्मी व आरोग्यलक्ष्मी प्रदान करणारे आहे. या सेवेतून समस्त सेवेकरी वर्गास उत्तम आरोग्यप्राप्ती व्हावी आणि मानवी जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आयुष्य सुखी-समाधानी व्हावे या उद्देशाने ही ऐतिहासिक सेवा पार पडणार आहे.
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंतगाला अंतिम ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाते. या शिवलिंगाला स्पर्श करुन दर्शन घेण्याची पद्धत आहे. संतती सुखासाठी तसेच संततीवर येणारी सर्व संकटे निवारण होण्यासाठी या शिवलिंगाचे दर्शन घेणे अत्यंत प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने कायिक-वाचिक आणि मानसिक आजारांचेही निवारण होते. घृष्मा नावाच्या एका महिला भक्ताच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर जनतेच्या उद्धारासाठी ज्योतिर्लिंग स्वरुपात या ठिकाणी स्थित झाले, म्हणून या स्थानाला ‘घृष्णेश्वर’ असे म्हटले जाते.
श्री क्षेत्र सन्नती, श्री क्षेत्र तिरुपती बालाजी नंतर प्रथमच श्री घृष्णेश्वराच्या पवित्र भूमीवर श्रीचक्रराज श्रीयंत्राचे पूजन आणि अतिरुद्र सेवा होईल. सकाळी साडेदहाच्या आरती नंतर परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगूज होऊन या दिव्य अनुभूती देणार्या सेवेची सांगता होईल. असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.