(राजापूर / तुषार पाचलकर)
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना राबविण्याच्या उद्देशाने राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामसभेने मान्यता दिलेल्या ग्रामस्तरीय आराखड्यांची पडताळणी करून प्रस्तावित कामांचा आढावा घेतला जात आहे. यासाठी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे.
राजापूर आणि लांजा तालुक्यांमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मंडळस्तरावर संयुक्त बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकांना तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO), कृषी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी उपस्थित होते.
बैठकांमध्ये ग्रामसभेने मान्यता दिलेल्या ग्रामस्तरीय आराखड्यांची सखोल छाननी करण्यात आली. संबंधित गावांमधील प्रस्तावित कामे, उपलब्ध पाण्याची स्थिती, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि आराखड्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.
केवळ प्रशासकीय स्तरावर नियोजन करण्याऐवजी ग्रामस्थांनी तयार केलेल्या आणि ग्रामसभेने मंजूर केलेल्या आराखड्यांच्या आधारे स्थानिक गरजा जाणून घेणे, विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधणे आणि प्रस्तावित कामांच्या अंमलबजावणीला गती देणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना दुष्काळ निवारण, पाणी व्यवस्थापन, उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर, लोकसहभाग आणि शाश्वत जलसंधारणाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
लोकसहभागातून नियोजन, विविध विभागांच्या समन्वयातून अंमलबजावणी आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करण्याच्या उद्देशाने राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सुरू केलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


