( चिपळूण )
चिपळूण शहरातील पेठमाप भागातील विश्वदर्शन केबल येथे आज (१ ऑक्टोबर) रोजी लोकवस्तीत मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली. स्थानिक नागरिक रूपेश पवार यांनी याची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
माहिती मिळताच चिपळूण वन विभागाचे वनरक्षक राहुल गुंठे (रामपूर) आणि वनरक्षक कृष्णा इरमले (कोळकेवाडी), तसेच बचाव पथकातील अजय बडदे व अथर्व घाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. पथकाने परिस्थितीची पाहणी करून मगरीला कोणतीही इजा होणार नाही, याची खबरदारी घेत बचावकार्य सुरू केले. आवश्यक दक्षता घेत मगरीला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
बचावानंतर मगरीची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
सदर बचावकार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान आणि वनपाल एस. एस. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. लोकवस्तीत मगर आढळल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला.


