(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात शके १९४८ च्या भाद्रपदी गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, १३ सप्टेंबर रोजी श्री गणरायाच्या चरणी सहस्र (१०००) मोदक समर्पण विधी भक्तिभावाने पार पडला.
संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंचकमिटीच्या वतीने विश्वस्त तथा सचिव विनायक तुकाराम राऊत यांनी पत्नीसमवेत श्रींची पूजा करून सहस्रनाम समर्पण केले. यावेळी मुख्य पुजारी डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांनी सहस्रनाम पठण केले. मुख्य पुजारी अनय घनवटकर, ओंकार घनवटकर आणि अभिजीत घनवटकर यांच्यासह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
पूजाविधी आणि नामजपामुळे मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडावेत यासाठी पंचकमिटीचे विश्वस्त आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


