( चिपळूण / वार्ताहर )
धावण्यातील सातत्य, नियमित सराव आणि फिटनेसची आवड याच्या जोरावर चिपळूणच्या सौ. मनस्वी मानस गुढेकर यांनी सह्याद्री हिल मॅरेथॉन २०२६ मध्ये शानदार कामगिरी केली. ३६ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला गटात त्यांनी प्रतिस्पर्धी धावपटूंना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल त्यांना १० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
वैष्णवी फाउंडेशन, डोंबिवली प्रस्तुत आणि माजी विद्यार्थी संघटना, शिपोशी, लांजा आयोजित या स्पर्धेत शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला होता. चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपचेही २५ सदस्य स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी सात धावपटूंनी विविध वयोगटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत पोडियम फिनिशर होण्याचा मान मिळविला.
मनस्वी गुढेकर यांच्या यशाला विशेष महत्त्व आहे. त्या गेल्या सलग चार वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये आपल्या वयोगटात सातत्याने पोडियम फिनिशर ठरत आहेत. नियमित सराव, शिस्त आणि जिद्द यांच्या बळावर त्यांनी धावण्याच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मनस्वी गुढेकर या Mankind Pharma कंपनीचे अधिकारी आणि चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपचे सदस्य मानस गुढेकर यांच्या पत्नी आहेत. पती-पत्नी दोघांनाही धावण्याची तसेच फिटनेसची विशेष आवड असून, या आवडीमुळे ते धावण्याच्या क्षेत्राशी जोडले गेले आहेत.
सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आरोग्य, फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला. ग्रुपमधील सात धावपटूंनी मिळविलेल्या यशामुळे या कामगिरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मनस्वी गुढेकर यांच्यासह चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपच्या यशस्वी धावपटूंचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


