(रत्नागिरी / वार्ताहर)
दिवाळी पाडव्याच्या मंगलमय पहाटे चिपळूण नगरीत सुरेल संगीताची मैफल रंगली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर दिवाळी पहाट’ या विशेष संगीत कार्यक्रमाला चिपळूणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पहाटेच्या प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणात पार पडलेल्या या मैफलीत प्रसिद्ध अभिनेते व गायक अमोल बावडेकर आणि सुप्रसिद्ध गायिका ईशानी पाटणकर यांनी आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अमोल बावडेकर यांच्या दमदार आणि भावस्पर्शी सादरीकरणाने मैफलीत रंगत आणली, तर ईशानी पाटणकर यांच्या मधुर स्वरांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात सादर करण्यात आलेले सुरेल अभंग, भक्तिगीते आणि लोकप्रिय मराठी भावगीतांनी सभागृहात भक्तिरस व संगीताचा सुंदर संगम घडवला. कलाकारांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत मैफलीला भरभरून प्रतिसाद दिला.
दिवाळीच्या सणासुदीच्या धावपळीतून वेळ काढत चिपळूणसह जिल्ह्याच्या विविध भागांतील संगीतप्रेमींनी पहाटेपासूनच सांस्कृतिक केंद्रात मोठी गर्दी केली होती. सांस्कृतिक कार्य विभागाच्या या दर्जेदार उपक्रमामुळे चिपळूणकरांच्या दिवाळी पाडव्याची सुरुवात सुरेल, आनंददायी आणि अविस्मरणीय झाली.


