( चिपळूण )
महाबळेश्वर येथे झालेल्या प्रतिष्ठित सह्याद्री क्लासिक चार घाट सायकलिंग स्पर्धेत चिपळूणचे सायकलपटू प्रशांत संभाजी दाभोळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मास्टर कॅटेगरीत सातवा क्रमांक पटकावला, तर एस. आर. अंकुश जंगम यांनी ओपन कॅटेगरीत अकरावा क्रमांक मिळवला.
देशभरातून सुमारे २०० सायकलपटूंनी सहभाग घेतलेल्या या आव्हानात्मक शर्यतीत केलघर (१७ किमी), आंबेनळी (३२ किमी), तापोला (२५ किमी) आणि पुन्हा केलघर (१७ किमी) अशा चार कठीण घाटांचा समावेश होता. या सर्व चढायांचे एकत्रित ३००० मीटरपेक्षा अधिक एलेवेशन असल्याने स्पर्धा अत्यंत कठीण मानली जात होती.
स्पर्धेची सुरुवात सकाळी ५.३० वाजता केलघर घाटापासून झाली. निर्धारित १ तास ३० मिनिटांच्या कटऑफ वेळेपेक्षा खूप आधीच, केवळ १ तास ०८ मिनिटे ५० सेकंदांत प्रशांत आणि अंकुश यांनी पहिला टप्पा पूर्ण केला. त्यानंतर आंबेनळी घाटाची ३२ किमी चढाई त्यांनी २ तास २९ मिनिटे ४८ सेकंदांत पूर्ण केली, जेथे कटऑफ वेळ ३ तास १५ मिनिटे होती.
दुपारी २ वाजता सुरू झालेली तापोला घाटाची २५ किमी चढाई त्यांनी १ तास ४० मिनिटांत पार केली. शेवटचा केलघर घाटाचा टप्पा त्यांनी १ तास १४ मिनिटे १४ सेकंदांत पूर्ण केला.
एकूण ८ तास ४५ मिनिटांची वेळ मर्यादा असलेल्या या स्पर्धेत प्रशांत दाभोळकर यांनी सर्व टप्पे मिळून केवळ ६ तास ३२ मिनिटे ५२ सेकंदांत रेस पूर्ण करत मास्टर कॅटेगरीत सातवा क्रमांक आणि फिनिशर मेडल पटकावले. अंकुश जंगम यांनीही ६ तास ४३ मिनिटे ४६ सेकंदांत रेस पूर्ण करून ओपन कॅटेगरीत अकरावा क्रमांक मिळवला.
यशाबद्दल प्रतिक्रिया देताना प्रशांत दाभोळकर म्हणाले, “कुटुंब, मित्रपरिवार आणि मार्गदर्शक यांच्या पाठिंब्यामुळेच या कठीण स्पर्धेत ही कामगिरी शक्य झाली.” त्यांनी विक्रांत अलेकर, प्रसाद अलेकर, हेमंत भोसले, अद्वैत केळकर, अथर्व भोसले, डॉ. मनीषा वाघमारे, ज्योती परांजपे, रमा करमरकर, डॉ. सचिन खेडेकर, सायकलिस्ट आशिष आयरे तसेच चिपळूण सायकलिंग क्लब यांचे विशेष आभार मानले.
महाबळेश्वरच्या अवघड घाटरस्त्यांवर मिळवलेले हे यश चिपळूण सायकलिंग समुदायासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

