(लांजा)
एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची माळ चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना लांजा बसस्थानक परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंगणे-हांदेवाडी येथील रहिवासी जयश्री एकनाथ बने (वय ७५) या आपल्या गावी जाण्यासाठी लांजा बसस्थानकातून ‘लांजा-झर्ये’ या एसटी बसमध्ये चढत होत्या. त्या वेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गोंधळाचा आणि गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २६ ग्रॅम वजनाची, गोल बारीक मण्यांची एकपदरी सोन्याची माळ हातचलाखीने काढून नेली.
घरी पोहोचल्यानंतर गळ्यातील माळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या चोरीमुळे त्यांना मानसिक धक्का बसला. दरम्यान, घटनेनंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि तीव्र अशक्तपणा जाणवल्याने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करता आली नाही. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी लांजा पोलिस ठाण्यात हजेरी लावत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी गर्दीच्या वेळी मौल्यवान दागिने व वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू पोलिसांकडून सुरू आहे.

