(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी दुर्वासने वडिलांच्या निधनानंतर उत्तरकार्यांसाठी जामीन मिळावा, या कारणावरून तिन्ही खून प्रकरणांत स्वतंत्र अर्ज दाखल केले होते. मात्र, सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी बुधवारी या तिन्ही अर्जांना नकार देत निकाल दिला.
दुर्वास पाटील याच्यावर प्रेयसी भक्ती मयेकर, तसेच सीताराम वीर आणि राकेश जंगम या तिघांच्या खुनाचे गंभीर आरोप आहेत. भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून, तर सीताराम वीर आणि राकेश जंगम यांच्या खून प्रकरणांचा गुन्हा जयगड पोलिसांत दाखल आहे. तथापि, या दोन्ही खून प्रकरणांचा तपास सध्या रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
वडिलांच्या निधनानंतर उत्तरकार्यांसाठी तात्पुरता जामीन मिळावा, अशी मागणी दुर्वासने केली होती. परंतु न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य, तपासाची स्थिती आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता यांचा विचार करून जामीन देण्यास नकार दर्शविला आहे.

