(दापोली)
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) व NASA (अमेरिका अंतराळ संशोधन संस्था) अभ्यासदौऱ्यासाठी तालुकास्तर चाळणी परीक्षा दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. या परीक्षेसाठी एकूण २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यामधून १० गुणवंत विद्यार्थी जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
परीक्षा केंद्रास भेट दिल्यानंतर गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “रत्नागिरी जिल्हा परिषदेने गोरगरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने स्वप्नवत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा आहे”
यावेळी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, नोडल अधिकारी बळीराम राठोड तसेच विस्तार अधिकारी नजीर वलेले यांनी तालुकास्तर निकाल जाहीर करत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तर चाळणी परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी :
- चंद्रनगर शाळा : आरोही महेश मुलुख, निरजा मनोज वेदक
- हर्णे नं. १ शाळा : आध्या सुमित कदम, सृष्टी सुदर्शन कोठावळे
- गावरई : परी राजेश प्रजापती
- नवशी शाळा : प्रांजल चंद्रकांत खळे
- विरसई : अक्षरा राजेंद्र पाटील
- देहेण शाळा : सुष्टी प्रभाकर साळवी
दरम्यान, जिल्हास्तरीय मूल्यमापन प्रक्रिया व मार्गदर्शक शिक्षकांसाठी निवड चाचणी दि. ९ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. याच प्रक्रियेतून ISRO व NASA अभ्यासदौऱ्यासाठी अंतिम निवड होणार असल्याने, कोणते विद्यार्थी व कोणते मार्गदर्शक शिक्षक ही संधी मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०४ विद्यार्थ्यांतून निवड झालेल्या या दहा गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

