(दापोली)
श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण शाखा दापोली येथे खोट्या नावाने आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारास घडली असून, गुन्हा त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी निशिगंधा प्रशांत हेदुकर (रा. दापोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वैभव भगत (पत्ता माहिती नाही.) सरिता दिपक ठाकरे (पत्ता माहिती नाही.) यांनी ‘वनिता सुरेश केलकर’ या बनावट नावाने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून ते सादर केले. तसेच बनावट दागिने गहाण ठेवून, ते खरे असल्याचे भासवून श्री समर्थ भंडारी पतसंस्थेतून २ लाख १० हजार रुपयांचे सोने तारण कर्ज उचलले आणि फसवणूक केली. याच आरोपींनी चिपळूण शाखा, हर्णे येथेही ‘सरिता नरेश तवसाळकर’ या खोट्या नावाने कागदपत्रे तयार करून तिथेही गहाण देण्याचा प्रयत्न करत फसवणुकीचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी रोशन गोविंद पेंढारी (मूळ रा. कोळे, ता. म्हसळा, जि. रायगड; सध्या रा. तुळशेत पाडा, भांडुप), वैभव भगत (पत्ता उपलब्ध नाही) आणि सरिता दीपक ठाकरे (पत्ता उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा रजिस्टर नंबर ७४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३१८(४), ३१९(२), ३३५, ३३६(३) व ३(५) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.