(दापोली)
तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी वाळूमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप गोपाळ कुंबेटे (रा. कर्दे, खांबेवाडी, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीप याला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कर्दे समुद्रकिनारी वाळूमध्ये तो बेशुद्धावस्थेत पडलेला स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. त्याच्या शरीरात काही प्रमाणात हालचाल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा भाऊ भालचंद्र गोपाळ कुंबेटे यांनी तातडीने रुग्णवाहिकेद्वारे त्याला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवले.
मात्र रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या (एमएलसी) आधारे ११ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री दापोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कर्दे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

