(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील मुगीज कलमपेठ येथे बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि कोयंडा तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने लोखंडी कपाट उचकटून लॉकरमधील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही चोरी ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी पांडुरंग भिकू झाटे (वय ५०, व्यवसाय माळीकाम, सध्या रा. विठावा गजानन नगर, कोळीवाडा, ठाणे पश्चिम; मूळ रा. मुगीज कलमपेठ, ता. दापोली) यांचे घर क्रमांक ४७६ बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप व कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने पुढील पडवीलगतच्या भिंतीतील स्लायडिंग खिडकी सरकवून खोलीत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उचकटून त्याच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्याने नेलेल्या ऐवजात सुमारे ३० ग्रॅम वजनाचे काळे मणी गुंफलेले सोन्याचे मंगळसूत्र, सुमारे २० ग्रॅम वजनाचे दुसरे सोन्याचे मंगळसूत्र, सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि सुमारे २० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या या सर्व दागिन्यांची किंमत सुमारे ८ लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बंद घराची रेकी करून चोरट्याने संधी साधली असावी का, यासह घरफोडीची पद्धत आणि चोरट्याच्या हालचालींच्या दिशेने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणी १ सप्टेंबर २०२६ रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंद घर फोडून मोठ्या किमतीचे दागिने लंपास झाल्याने परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. या घरफोडीमागील चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

