(दापोली /रत्नागिरी प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात आवाज उठवत भारतीय बौद्ध महासभेच्या भोमडी शाखेचे कार्यकर्ते व संस्कार विभागाचे सचिव आयु. अतिश घाडगे यांनी दिलेल्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याला आता पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली आहे. उपोषणाचे पत्र प्राप्त होताच पंचायत समिती दापोलीतर्फे २४ सप्टेंबर रोजी सकाळी १२ वाजता गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भोमडी गावातील समाज मंदिरात वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देण्यास अडचणी येत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली होती. या संदर्भात ग्रामपंचायतपासून पंचायत समितीपर्यंत अनेक निवेदने सादर करण्यात आली, तरीही समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही. उलट, आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमासाठी कर आकारला गेला नसताना केवळ बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाकरिता कर मागितला जात असल्याची खंत महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पत्र दिल्यानंतर उत्तर मिळायला २५ दिवस लागणे ही प्रशासकीय न्यायनीतीची खिल्ली आहे. प्रशासनाची भूमिका न्याय्य नसल्यास अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता व परंपरा आमच्यात आहे, असा ठाम इशारा अतिश घाडगे यांनी दिला आहे.
दरम्यान, वर्षावास कार्यक्रमानंतर घेतलेल्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखी ठराव घेत, उपोषणाची वेळ आली तर पूर्ण सहकार्य करू, असे स्पष्ट केले आहे. मात्र घाटगे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आता २४ सप्टेंबरला होणाऱ्या चर्चेत या वादाचा तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाधानकारक तोडगा निघाला नाही तर…..
दापोली संस्कार विभागाचे सचिव आयु. अतिश घाडगे यांच्या लढ्याला आम्ही केवळ पाठीशी नाही, तर खांद्याला खांदा लावून सोबत आहोत. प्रशासनाने चर्चेसाठी बोलावले आहे, ही सकारात्मक बाब असली तरी जाणीवपूर्वक टाळाटाळ किंवा दुर्लक्ष केले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आम्ही ताकदीने आंदोलनात उतरू आणि प्रशासनाला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, अशी ठाम भूमिका रत्नागिरी जिल्हा संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव यांनी स्पष्ट केली आहे.

