(शिर्डी /अहिल्यानगर)
संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गच्चीवर पतंग उडवत असताना धाग्याऐवजी धोकादायक बायडिंग तारेचा वापर केल्यामुळे हाय-व्होल्टेज वीज वाहिनीसोबत संपर्क होऊन 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
पुणे येथून संक्रांतीच्या सुट्टीनिमित्त कोपरगाव येथे नातेवाइकांकडे आलेला अर्णव महेश व्यवहारे (वय 14) हा आपल्या मित्र ऋषिकेश संजय वाघमारे (वय 19) याच्यासोबत गच्चीवर पतंग उडवत होता. पतंग उडवण्यासाठी त्यांनी पारंपरिक धाग्याऐवजी धातूची बायडिंग तार वापरली होती. उत्साहाच्या भरात ही तार जवळून जाणाऱ्या हाय-व्होल्टेज वीज वाहिनीस स्पर्श झाली.
या अपघातात अर्णवला तीव्र विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत दोघांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अर्णवला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गंभीर जखमी ऋषिकेशला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर लक्ष्मीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संक्रांतीच्या काळात पतंग उडवताना बायडिंग तार, नायलॉन मांजा किंवा धातूच्या तारा वापरणे अत्यंत धोकादायक असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरीही निष्काळजीपणामुळे अशा जीवघेण्या घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच नागरिकांनी पतंग उडवताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

