(कोल्हापूर )
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव परिसरातून नातेसंबंधांना हादरा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने भरदिवसा, भररस्त्यात धारदार कोयत्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यात अमृता दीपक कांबळे (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती दीपक लाडू कांबळे (वय ३५) याला तात्काळ अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे पेठवडगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भररस्त्यात घडलेल्या या थरारक प्रकाराने नागरिक हादरले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दीपक कांबळे आणि अमृता यांचा चार वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. दीपक हा अमृताच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता, यामुळे त्यांच्यात सतत वाद होत होते. बुधवारी दुपारी अमृता या येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे वकिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, याची कुणकुण लागताच आरोपी दीपक त्या ठिकाणी पोहोचला. आज कुठे गेली होतीस? अशी विचारणा करत त्याने अमृता यांच्याशी भांडण सुरू केले.
चार वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक आणि अमृता यांचा सुमारे चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली असून सुरुवातीच्या काळात त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दीपक पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. कौटुंबिक वाद वाढत गेल्याने अमृता यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता.
वकिलाला भेटण्यासाठी गेल्यानंतर घडली घटना
बुधवारी संध्याकाळी अमृता या पेठवडगाव येथील एसटी स्थानकाजवळील एका व्यावसायिक संकुलात वकिलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांची हालचाल आरोपीला समजल्यानंतर तो धारदार कोयता घेऊन परिसरात दबा धरून बसल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अमृता वकिलाची भेट घेऊन बाहेर पडताच आरोपीने त्यांना अडवले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. यावेळी अमृता यांनी आपल्या मुलीची शपथ घेत, माझ्यावर विनाकारण संशय घेऊ नकोस, अशी विनवणी केली. मात्र काही क्षणांतच हा वाद हिंसक झाला आणि आरोपीने कोयत्याने त्यांच्यावर वार केल्याचा आरोप आहे. हात व मानेवर ६ ते ८ वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला
हल्ल्यानंतर अमृता गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. परिसरातील नागरिक आणि काही तरुण त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र, आरोपीच्या हातात धारदार शस्त्र असल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या अमृता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
प्राथमिक तपासानुसार, हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही तासांपूर्वी आरोपी दीपकने आपल्या मोबाईलवर “आज माझा तरी शेवट… नाही तर पुढच्याचा” असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर आरोपीने हल्ल्यासाठी वापरलेले धारदार शस्त्र एसटी स्थानकाच्या पाठीमागील गटारीत फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. या सर्व प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीच्या हालचाली आणि घटनाक्रमाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
आरोपी अटकेत
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक कांबळे याला अटक केली असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले असून घटनेच्या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे सुरू आहे.
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल?
प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. दोघांमधील कौटुंबिक वाद, पूर्वी झालेल्या तक्रारी आणि इतर कारणांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा घटना रोखण्यासाठी वेळेत समुपदेशन, कायदेशीर मदत आणि सामाजिक हस्तक्षेपाची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

