(सातारा / वृत्तसंस्था)
सातारा-पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर खंडाळा तालुक्यातील शिरवळ-राजेवाडी मार्गावर १४ सप्टेंबर रोजी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून या प्रकरणाचा छडा लावण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हर्षदा हणमंत जाधव (वय १९) असे मृत तरुणीचे नाव असून, तिची हत्या तिचे वडील हणमंत दामोदर जाधव आणि चुलत चुलते बाळू अंकुश जाधव यांनी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिरवळ-राजेवाडी रस्त्यालगतच्या निर्जन ठिकाणी १४ सप्टेंबर रोजी महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. मृतदेह संशयास्पद अवस्थेत असल्याने या घटनेत घातपाताची शक्यता तपासण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली तपास पथक तयार करण्यात आले.
सुरुवातीला मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी कोणताही ठोस धागा पोलिसांच्या हाती नव्हता. त्यामुळे घटनास्थळापासून पुणे आणि भोरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर तसेच सातारा-पुणे महामार्ग परिसरात खबऱ्यांकडूनही माहिती घेण्यात आली. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मृतदेहाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा माग काढण्यात आला. या तपासातून संशयित आरोपी निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासानुसार, हर्षदा घरातील व्यक्तींना शिवीगाळ करणे, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरणे, व्यसन करणे तसेच घरातील सदस्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देणे, अशा प्रकारचे वर्तन करीत असल्याचा आरोप आहे. तिच्या या वागण्याला आणि त्रासाला कंटाळून तिचे वडील आणि चुलत चुलत्याने तिला हॉटेलमध्ये जेवायला जायचे असल्याचे सांगून गाडीत बसवले. त्यानंतर तिच्या डोळ्यात आणि तोंडात चटणी घालून हाताने तोंड व नाक दाबून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
हत्येनंतर त्याच वाहनातून हर्षदाचा मृतदेह सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर आणून टाकल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी हणमंत दामोदर जाधव, रा. जांभुळवाडी (रा. आंबेगांव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) आणि बाळू अंकुश जाधव, रा. प्रगतीनगर-इंदोरी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.


