(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपीठात राष्ट्र,धर्म आणि समाज हितासाठी घेण्यात आलेल्या एक दिवसीय श्रीमद् गुरुचरित्र पारायणात १०८० आणि नवनाथ पारायणात २३१० सेवेकर्यांनी सहभाग घेतला. परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी या सर्व सेवेकऱ्यांचे कौतुक केले.
त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये दर महिन्यातील चौथ्या शनिवारचा अपवाद वगळता सर्व शनिवारी एक दिवसीय सामूहिक गुरुचरित्र पारायण आणि दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी नवनाथ पारायण घेण्यात येते. या सर्व सेवा मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्तीपासून राष्ट्राचे संरक्षण व्हावे आणि जीवसृष्टीचं कल्याण व्हावे या उद्देशाने घेण्यात येतात. शनिवारी (दि१३डिसेंबर)गुरुचरित्र आणि रविवारी (दि.१४डिसेंबर) नवनाथ भक्तिसार पारायणात सेवेकऱ्यांनी सहभागी होऊन श्रींच्या चरणी सेवा समर्पित केली.
भस्म लिंगार्चन सोहळ्यात सहभागी व्हा
परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी सेवेकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, ५ जानेवारी २०२६ रोजी श्रीक्षेत्र उज्जैन येथे होणाऱ्या भस्म लिंगार्चन सोहळ्यात सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाकालाच्या चरणी सेवा रुजू करावी. तर मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू नका, त्याऐवजी भारतमातेच्या प्रतिमेसमोर महिलांनी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आणि पुरुषांनी स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करावे असा उपदेश त्यांनी केला. तर गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे यांनी सांगितले की,दिव्यग्रंथांच्या पारायणामुळे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाची प्राप्ती होते.
११ जानेवारीला नवनाथ पारायण
नवीन वर्षाच्या प्रारंभी ११ जानेवारी २०२६ रोजी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे सामूहिक एक दिवसीय पारायण घेण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

