(ठाणे)
कल्याण येथील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या परप्रांतीय माथेफिरूला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचा दिवसभर शोध सुरु होता आणि अखेरीस तो वसार गावातील शेतात पळून जात असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
घटनेच्यावेळी आरोपी गोकुळ झा कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात थेट डॉक्टरांना भेटण्यासाठी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. रुग्णालयाच्या रिसेप्शन ठिकाणी काम करणाऱ्या सोनाली कळासरे या मराठी तरुणीने त्याला थांबवले असता, संतप्त झालेल्या गोकुळ झाने तिच्यावर हात उचलला. त्याने तिच्या छातीवर लाथ मारत केस ओढून धक्काबुक्की केली. यावेळी त्याने तिला जोरदार मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला.
दिवसभर या आरोपीचा शोध सुरू होता. रात्रीच्या सुमारास तो वसार गावाजवळील शेतात लपण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळी मनसे सैनिकांनी याबाबतची माहिती मिळाली, त्यांनी त्वरित सतर्कता दाखवत त्याला पकडले आणि पोलिस स्टेशनमध्ये आणून सुपूर्द केले.
मनसेसह ठाकरे गटाने देखील या घटनेचा निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, गोकुळ झा याला अवघ्या चारच दिवसांपूर्वी ट्रकचालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात जामिनावर सोडण्यात आले होते. याच आरोपीवर विठ्ठलवाडी आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यांत मारहाणीचे आणि शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच विशेष पथके तयार केली होती. अटक केल्यानंतर गोकुळ झा याला आज सकाळी कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे.