(लांजा)
लांजा तालुक्यातील कुवे गावाच्या घोडखिंड परिसरात बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दुचाकीस्वार तरुणावर झडप घातल्याची खळबळजनक घटना घडली. या थरारक प्रसंगात तरुणाने प्रसंगावधान राखल्याने जीवघेणा अनर्थ टळला.
कुवे माळवाडी येथील रहिवासी योगेश सुधीर पवार (वय २६) हे काम आटोपून मोटारसायकलवरून घरी परतत होते. घोडखिंड परिसरात पोहोचताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. हल्ला लक्षात येताच योगेश यांनी स्वतःला वाचवण्यासाठी मोटारसायकलसह रस्त्यावर झोकून दिले.
यावेळी मोटारसायकल घसरल्याने योगेश खाली पडले आणि त्यांना हातापायाला दुखापत झाली. मात्र त्यांच्या पाठीवरील बॅगेमुळे बिबट्याचा थेट हल्ला टळला आणि ते थोडक्यात बचावले. घटनेनंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.
या घटनेनंतर जखमी योगेश पवार यांच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

