(संगमेश्वर / एजाज पटेल)
लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव यांना नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (API) पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते त्यांना स्टार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
29 वर्षांची निष्ठेची कारकीर्द
सचिन भुजबळराव हे संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे गावचे रहिवासी आहेत. 1995 साली त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवेला सुरुवात केली. गेल्या २९ वर्षांत त्यांनी चिपळूण, संगमेश्वर, देवरुख आणि सध्या लांजा पोलीस ठाण्यात विविध पदांवर (कॉन्स्टेबल, नाईक, हेड कॉन्स्टेबल) कार्यरत राहून उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
2021 साली महाराष्ट्र दिनी त्यांच्या कर्तव्यपर सेवेची दखल घेत त्यांना “महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदक” देऊन गौरविण्यात आले होते. पोलीस खात्यातील कामाबरोबरच ते सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांची मुन्सी (रायटर) म्हणूनही कार्यशैली प्रसिद्ध आहे.
सचिन भुजबळराव यांची पदोन्नती झाल्याचे कळताच त्यांच्यावर प्रत्यक्ष भेटी, फोन कॉल्स आणि सोशल मीडियावरून अभिनंदनाचा ओघ सुरू झाला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्रामवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. “कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला न्याय”, अशा शब्दांत नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे.