(राजापूर/ वार्ताहर)
जामदाखोरे क्रिकेट असोसिएशन, मुंबई (१२ गावांअंतर्गत) यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वोत्तम गणपती बाप्पा डेकोरेशन स्पर्धा २०२६’ ला सर्व गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या कलात्मकतेचे आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.
स्पर्धेचे परीक्षण जामदाखोरे क्रिकेट असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष श्री. दिलीप महेंद्र कांबळे, सचिव श्री. प्रदीप मोतीराम आयरे (मिळंद), उपाध्यक्ष श्री. आनंद जनार्दन घागरे (तिरवडे), सल्लागार श्री. जगदीश संभाजी आयरे, श्री. सचिन पांचाळ, श्री. यशराज कोलते (मूर) तसेच त्यांच्या सहकारी सदस्यांनी केले. परीक्षणानंतर स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
स्पर्धेत मु. पो. मूर (तांबळवाडी), ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील श्रेयस यद्रुक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मु. पो. जवळेथर (कांबळे वाडी), ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील दिनेश गुणाजी कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर मु. पो. तिरवडे (राटकोंडवाडी), ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील संदेश सिताराम मांडवकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये जांभवडे येथील ओम पालांडे आणि मूर येथील अमोल पवार यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे जामदाखोरे क्रिकेट असोसिएशन, मुंबईतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आयोजकांनी आभार मानले. स्पर्धकांच्या कलात्मकतेमुळे, उत्साहामुळे आणि सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. गावातील कला, संस्कृती, परंपरा आणि सर्जनशीलतेला भविष्यातही अशाच प्रकारे प्रोत्साहन मिळावे, अशी सदिच्छा आयोजकांनी व्यक्त केली.


