(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मराठी भाषा व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे यांनी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या साहित्यिक योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले, “‘डोह’ या साहित्यकृतीमुळे श्रीनिवास कुलकर्णी यांची ‘डोहकार’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. ते व्रतस्थ, संवेदनशील आणि साहित्याशी निष्ठा असलेले व्यक्तिमत्त्व होते.”
‘डोह’, ‘मनातल्या उन्हात’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’, ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या साहित्यकृतींच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. त्यांच्या साहित्याचा तरुण पिढीने अभ्यास करून त्यांच्या लेखनातील संवेदनशीलता आणि व्यक्तिमत्त्व समजून घ्यावे, असे आवाहनही डॉ. दाभाडे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रीनिवास कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

