(रत्नागिरी / प्रतिनिधी)
प्रवाशांची सोय व्हावी, व्यवहार सुलभ व्हावेत आणि सार्वजनिक वाहतूक अधिक आधुनिक व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रियेचा रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकातील केंद्रावर मात्र बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वारंवार डाऊन होणारा सर्व्हर, कार्ड ॲक्टिव्हेशनमधील तांत्रिक अडथळे आणि संथ कामकाजामुळे प्रवाशांना अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. नोंदणी करून महिना उलटूनही कार्ड हातात पडत नसल्याने ‘स्मार्ट’ व्यवस्थेचा कारभारच प्रवाशांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या केंद्रावरील गैरसोयीचा मोठा फटका बसत आहे. कार्ड मिळविण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहणे, पुन्हा-पुन्हा केंद्राच्या चकरा मारणे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे ऐकून माघारी फिरणे, असा अनुभव अनेक प्रवाशांना येत आहे. स्थानिक रहिवासी उज्ज्वला विपुल गुप्ते यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्डसाठी नोंदणी करून महिना उलटला. शनिवारी कार्ड घेण्यासाठी केंद्रावर बोलावण्यात आले होते. त्यानंतरही शुक्रवारी आणि १४ तारखेला अशा अनेकदा चकरा माराव्या लागल्या. मात्र, कार्ड ॲक्टिव्हेट होत नसल्याचे कारण देण्यात आले.
मंगळवारी सकाळी दहा वाजता त्या पुन्हा केंद्रावर पोहोचल्या. दुपारी दीड वाजेपर्यंत त्या प्रतीक्षेत होत्या; मात्र त्यांचा नंबरच आला नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यातच संबंधित कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी निघून गेल्याने रांगेतील नागरिकांच्या प्रतीक्षेत आणखी भर पडली. नागरिकांचा वेळ म्हणजे प्रशासनासाठी अमर्यादित उपलब्ध असलेली गोष्ट आहे, अशाच थाटात या केंद्राचा कारभार सुरू असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. मानसी वैद्य यांनीही आपला संताप व्यक्त केला. कार्ड काढण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सतत चकरा मारत असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे पंधरा-वीस दिवसांपूर्वी केंद्रावर गेल्यानंतर ‘सर्व्हर डाऊन आहे’ असे कारण सांगून त्यांना परत पाठविण्यात आले.
सध्या अनेक नागरिक पहाटे सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहत असल्याचे, तर काही नागरिक सकाळी अकरापासून प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दीच्या वेळेत अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून कामाला वेग द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एनसीएमसी कार्ड ही प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील व्यवहार सुलभ करणारी सुविधा असताना, त्याची नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया मात्र नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या नावाखाली सुविधा देण्याऐवजी नागरिकांना सर्व्हर, ॲक्टिव्हेशन आणि रांगांच्या चक्रव्यूहात अडकविण्याची वेळ आली असेल, तर व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. ज्येष्ठ नागरिकांना तासनतास उभे राहावे लागत असताना त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र व्यवस्था, पुरेसे कर्मचारी किंवा स्पष्ट मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. केवळ केंद्र सुरू करून नागरिकांना रांगेत उभे करणे आणि तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करणे, हा प्रशासनाच्या दृष्टीने जबाबदारी झटकण्याचा प्रकार ठरू नये.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी
रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकातील एनसीएमसी केंद्रावरील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करावेत, सर्व्हरची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, गर्दीच्या काळात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व सुलभ व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जात असताना आणि नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असताना वरिष्ठ प्रशासनाने केवळ तक्रारींची नोंद न करता प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


